



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी तसेच विभानगर येथील सांडपाणी प्रकल्प रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
आंदोलनादरम्यान भारत मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शविला. नागरिकांवर स्मार्ट मीटर लादण्याऐवजी या निर्णयाचा फेरविचार करून सक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच बिबानगर येथील प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पाबाबतही आंदोलनकर्त्यांनी आक्षेप नोंदविला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी भूमिका भारत मुक्ती मोर्चाने मांडली. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन साद केले. स्मार्ट मीटरची सक्ती आणि बिबानगर येथील सांडपाणी प्रकल्पासह अन्य मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.



