उभ्या कारला भीषण आग: संपूर्ण कार जळून खाक

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील बिग बाजार पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना २० एप्रिल रोजी घडली. या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

ही कार नवलसिंग दगडू तंवर यांच्या मालकीची असून त्यांनी ती पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे उभी केली होती. परंतु काही क्षणातच कारमधून धूर निघायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता ती संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी तत्काळ कारला लागलेली आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. पार्किंगमधील अन्य वाहने सुरक्षित अंतरावर असल्याने मोठा अनर्थ टळला.

कारला आग कशी लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत संबंधित विभाग चौकशी करत असून आग लागण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Protected Content