पहूरजवळ महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिक व वाहनचालक संतप्त

पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवरील पहूरजवळील रेल्वे लाईन परिसरात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था निर्माण झाली आहे. या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असून, कच्च्या मार्गावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

सदर महामार्गावर दररोज हजारो वाहने दळणवळणासाठी प्रवास करत असतात. मात्र, रेल्वे लाईनजवळील अपूर्ण रस्त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसाठी हे ठिकाण धोकादायक बनले असून, अनेक वेळा लहान-मोठे अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

वाहनचालकांनी व नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप आहेत. उन्हाच्या कडाक्यात आणि वाढत्या प्रवासामुळे प्रवाशांची होरपळ होत आहे.

स्थानिकांनी यासंदर्भात आवाज उठवायला सुरुवात केली असून, लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलना इशारा देण्यात आला आहे. अपघात टाळण्यासाठी आणि वाहनधारकांचा त्रास कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Protected Content