Home प्रशासन रावेर व यावल तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर जनआक्रोश ; रस्ते, रोजगारासाठी तहसीलदार कार्यालयासमोर...

रावेर व यावल तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर जनआक्रोश ; रस्ते, रोजगारासाठी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू

0
23


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत खराब झालेले रस्ते, रावेर व यावल तालुक्यातील तरुणांच्या वाढत्या बेरोजगारीकडे लोकप्रतिनिधींकडून होत असलेले दुर्लक्ष आणि मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोरकर, संजय चौधरी आणि सुरेश ठाकरे महाराज यांनी आजपासून रावेर तहसीलदार कार्यालयासमोर अनिश्चितकालीन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

रावेर व यावल तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य आणि ग्रामीण रस्त्यांची अतिशय चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्थानिक पातळीवर उद्योगांची निर्मिती न झाल्याने आणि रोजगारनिर्मितीस चालना न मिळाल्याने दोन्ही तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य पसरले आहे. दुसरीकडे बंद पडलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत वेतन आणि रोजगाराचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन या गंभीर समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी प्रशांत बोरकर, संजय चौधरी व सुरेश ठाकरे महाराज यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सकाळपासून सुरू झालेल्या या उपोषण स्थळी रावेर शहरातील तसेच परिसरातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे स्पष्ट केले. जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती, तरुणांसाठी रोजगाराच्या ठोस उपाययोजना आणि कारखान्याच्या कामगारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.


Protected Content

Play sound