
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाने संघटन बळकटीकरणाचा निर्धार व्यक्त केला.
ही बैठक सावदा येथील जेहरा हॉलमध्ये ३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पार पडली. बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी आमदार अरुण पाटील यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सावदा येथील माजी नगरसेविका सौ. करुणा पाटील आणि अतुल नेहते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांचा पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि माजी आमदार अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रवेशामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर नवचैतन्य लाभेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बैठकीत येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखण्यात आली. मतदारांशी थेट संवाद वाढविणे, संघटनात्मक बळ वाढविणे आणि कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण यावर विशेष भर देण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागात जनसंपर्क मोहिम राबविण्याचे आवाहन केले.
या बैठकीस शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता आगामी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मजबूत लढत देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



