भाजपचे हिंदुत्व म्हणजे चोरबाजार ! : शिवसेनेची टीका

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे हिंदुत्व म्हणजे एक प्रकारचा चोरबाजार असून त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहार देखील सामील झाला असल्याचा टोला लगावत आज शिवसेनेने या मुद्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात आज अयोध्या येथील जमीन घोटाळ्यावर भाष्य करण्यात आलेले आहे. यात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत, योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला, पण त्याच दरम्यान भाजप परिवारातील व्यापार्‍यांनी मंदिर परिसरातील मोक्याच्या जमिनींचे व्यवहार सुरू केले. मंदिरासाठी राम जन्मभूमी ट्रस्टने ७० एकर जमिनीचे अधिग्रहण केले, पण त्याच वेळी भाजपसंबंधित आमदार, नगरसेवक, पोलीस अधिकाऱयांनी जमिनी विकत घेऊन मोठया प्रमाणात गुंतवणूक केली.

यात पुढे म्हटले आहे की, मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल व आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे. राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण व मंदिराच्या नावावर मलिदा खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे. व्यवहार कसा झाला तो पहा. अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्या जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला १६ कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. महापौर श्री. उपाध्याय हे भाजपचे. प्रभू श्रीरामाच्या नावावरचा हा चोरबाजार. यालाच कोणी हिंदुत्व मानत असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत घातलेलेच बरे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, राममंदिराचा लढा उभारून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविणाऱया लालकृष्ण आडवाणींना अडगळीत टाकले व आता राममंदिर परिसरात व्यापारी केंद्रे उभी केली. म्हणजे मंदिरासाठी बलिदाने इतरांची व व्यापार यांचे. स्वातंत्र्य विकून खाणारे व राममंदिराचा व्यापार करणारे एकाच जातकुळीचे आहेत. जे स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत त्यांनी स्वातंत्र्यानंतर सत्तेचा सर्वात जास्त फायदा घेतला. भाजप पुढार्‍यांनी एखाद्या मंदिर उभारणीची घोषणा केली किंवा मंदिराचे भूमिपूजन केले की आसपासच्या परिसरातील लोकांना भीती वाटू लागते. आमच्या जमिनीचे काय होणार, हे भय त्यांना वाटते.

या अग्रलेखात शेवटी नमूद करण्यात आले आहे की, भाजपने हे जे नवहिंदुत्व निर्माण केले आहे त्यामुळे हिंदू समाज बदनाम होईल व निराशेच्या गर्तेत जाईल. ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय आता कायमस्वरूपी अयोध्येतच उघडायला हवे. नंतर मथुरा आहेच. राम नाम सत्य है हे इतरांसाठी. भाजपसाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे! लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱयांना श्रीराम माफ करणार नाहीत! देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे! असा इशारा या अग्रलेखात देण्यात आलेला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!