भुसावळ पालिकेच्या शेवटच्या सभेत बहुतांश विषयांना मंजुरीचे नियोजन

भुसावळ प्रतिनिधी | येथील नगरपालिकेची या पंचवार्षिकमधील शेवटची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पध्दतीत होणार असून यामध्ये महत्वाच्या विविध विषयांना मान्यता देण्याचे नियोजन सत्ताधार्‍यांनी केल्याचे दिसून येत आहे.

भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांची पंचवार्षिक सत्ता २९ डिसेंबर रोजी संपणार असून यानंतर पालिकेवर प्रशासकराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, पालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २७ रोजी सकाळी अकरा वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाची आपत्ती कोसळल्यानंतर भुसावळ पालिकेच्या सर्व सभा ऑनलाईन या प्रकारातच झालेल्या होत्या. आता शेवटची सभा मात्र पहिल्यांदाच ऑफलाईन या प्रकारात होणार आहे. या सभेत तब्बल २६४ विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यामध्ये भुयारी व खुल्या गटारींचे बांधकाम, रस्ते कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, नाल्यांवर संरक्षण भिंत बांधणे, विविध भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, बेघरांसाठी निवारा केंद्र, ओपन जिम असे विषय सभेच्या अजेंड्यावर आहेत. यासोबत काही प्रभागांमधील महत्वाची कामे देखील या सभेत मार्गी लावण्यात येणार आहेत. याच्या अंतर्गत प्रभाग दहामध्ये विविध ठिकाणी स्थळ व नाम दर्शक फलक तयार करणे, प्रभाग सातमध्ये खुल्या भूखंडावर उद्यान विकसित करणे, प्रभाग सहामध्ये रस्ते कामे आदींना मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.

पंचवार्षिकच्या शेवटच्या टप्प्यात भुसावळ शहरातील कामांना गती देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने शेवटच्या सर्वसाधारण सभेमध्ये अजून महत्वाची कामे घेऊन यांना निवडणुकीच्या आधी पूर्ण करण्याचे नियोजन सत्ताधार्‍यांनी केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.

Protected Content