जामनेर तालुक्यात भाजपाने सन्मानाने जागा द्याव्यात –  उमेश नेमाडे 


जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) ला महायुतीत सन्मानपूर्वक जागा द्याव्यात, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली आहे.

जामनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उमेश नेमाडे यांनी सांगितले की, “महायुती ही तीन पक्षांची (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट) एकत्रित लढाई आहे. या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यात आमचा पक्ष कार्यकर्त्यांपासून जनतेपर्यंत मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाने आम्हाला सन्मानपूर्वक आणि योग्य जागा देणे गरजेचे आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही जामनेर तालुक्यात महायुतीचा भाग म्हणून पूर्ण क्षमतेने निवडणुकीसाठी सज्ज आहोत. आमचे कार्यकर्ते गावपातळीवर सक्रिय आहेत. सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपाने युतीच्या घटक पक्षांचा सन्मान राखत योग्य समन्वय साधावा.”

पत्रकार परिषदेत युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बंगालीसिंग चितोडिया, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, तसेच नरेंद्र जंजाळ, नाना राजमल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नेमाडे यांनी युतीतून एकदिलाने लढा देण्याचा आणि कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा संदेश दिला.

जामनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहता, राष्ट्रवादी (अजितदादा गट) आणि भाजपातील जागावाटपाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असून, नेमाडे यांच्या या विधानाने स्थानिक राजकारणात नवे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे.