भाजपने २८८ मतदारसंघात तयारी केली – मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २८८ मतदारसंघांत तयारी केली आहे. जास्तीची तयारी सरकार येण्यासाठी उपयुक्त ठरते, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भाजपने सर्व २८८ मतदारसंघांत निरीक्षक नियुक्त केले आहेत. महायुतीतील सहयोगी पक्षांचे उमेदवारही विजयी झाले पाहिजेत, यासाठी ही तयारी आहे. प्रत्येकाने जास्तीची तयारी करायची असते. ती तयारी पक्षाला न मिळालेल्या जागांवर सहयोगी पक्षांसाठी वापरायची असते.

कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांची भाजपची विभागीय बैठक कोल्हापुरात झाली. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असून, भाजप जोरदार तयारी करत आहे. लोकसभेमध्ये भाजप, महायुतीला यश कमी मिळाले, तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीची मते महाविकास आघाडीपेक्षा दोन लाखांनी अधिक आहेत. हे यश दुर्लक्षित करून चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांच्या मार्फत संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. दक्षिण विभाग प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे दाखले दिले.

Protected Content