गोंधळ घालणाऱ्या तरूणाला हटकल्यावरून हवालदारावर कोयत्याने वार


सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सातारा बसस्थानकात आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदारावर कोयत्याने वार केला आहे. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दत्ता पवार असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे. दत्ता पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चौकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरूण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याची माहिती त्यांना प्रवाशांनी दिली.

त्यानंतर दत्ता पवार बसस्थानकाबाहेर आले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पवार यांनी दंगा घालणाऱ्या तरूणांना हटकले. त्यानंतर धुडगूस घालणारे तरुण तेथून निघून गेले. हवालदार दत्ता पवार हे पुन्हा दंगा होऊ नये म्हणून काही वेळ बसस्थानकाबाहेरच उभे होते.

सुमारे 15 मिनिटानंतर मोपेड दुचाकीवरून चौघे जण त्या ठिकाणी आले. दत्ता पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरूणाने त्यांच्या काखेत कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरूण मोपेडवरून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु संबंधित तरूण सापडले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.