Home क्राईम हद्दपार सराईत गुन्हेगाराकडून ३५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त

हद्दपार सराईत गुन्हेगाराकडून ३५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध धडक कारवाई करत त्याच्याकडून विनापरवाना गावठी पिस्तूल जप्त केले आहे. आरोपी विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाली (वय ३२) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून मॅगझीनसह सिल्वर रंगाचे लोखंडी गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १ जुलै २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, विजय अहिरे हा गेंदालाल मिल परिसरातील लोकशेड भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे. प्राप्त माहितीची पडताळणी करून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलजवळ सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करण्यात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपीविरुद्ध आठ गंभीर गुन्हे

पोलीस माहितीनुसार विजय अहिरे उर्फ भोमपाली हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल, शस्त्र कायद्याचे उल्लंघन अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. जळगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचे अनेक गुन्हे नोंद आहेत. तसेच दंगल, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, शस्त्र बाळगणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्यासंबंधीचे गुन्हेही दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अकम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव तसेच पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडणे, राहुल रगडे आणि प्रदीप सपकाळे यांच्या पथकाने केली. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून शस्त्रासह फिरणाऱ्या आरोपीला पकडण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound