Home क्राईम चोपड्यात गावठी कट्टा, मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात गावठी कट्टा, मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांविरोधातील जळगाव पोलिसांची ही आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही संशयित व्यक्ती Hyundai EON कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराच्या दिशेने येत आहेत. माहितीची खातरजमा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने चोपडा–लासूर–चुंचाळे मार्गावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता संशयित Hyundai EON (एमएच-२० ईई-६१०३) ही कार अडवून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कारच्या मागील सीटखाली मॅगझिनसह एक गावठी कट्टा आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. आरोपींच्या अंगझडतीत तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

या कारवाईत ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९, रा. कुन्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव), सचिन रोशन पवार (वय ३४, रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरे साळुंखे (वय ३७, रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचे इतर कोणाशी संबंध आहेत का आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक नेमकी कोणासाठी केली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व मॅगझिन, १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपये किमतीची Hyundai EON कार तसेच ३० हजार रुपये किमतीचे Oppo, Vivo आणि Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन यांचा समावेश आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, दीपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे, रावसाहेब पाटील तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, युवराज बाकुंज आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


Protected Content

Play sound