भाजपचा माणूस तेलंगणाचा मुख्यमंत्री होणार !

हैदराबाद-वृत्तसेवा |  तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी यांचे नाव निश्चित करण्यात आले असून ते 7 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हाय कमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

रेवंत रेड्डी यांच्या राजकारणाची सुरुवात एबीव्हीपीमधून झाली होती. एबीव्हीपीतून राजकारणाचे धडे गिरवल्यानंतर टीडीपीत राहिल्यानंतर आता ते तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनणार आहेत. एबीव्हीपी ही भाजपची विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेतून आलेल्या व्यक्तीला काँग्रेस आता मुख्यमंत्रीपदी बसवणार आहे. संयुक्त आंध्रप्रदेशाच्या काळात कोडांगलमधून ते आमदार बनले होते. 2009 आणि नंतर 2014मध्ये ते टीडीपीच्या तिकीटावर लढले होते. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. पण 2018मध्ये काँग्रेसमधून लढले असता त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर काँग्रेसने त्यांना 2019मध्ये मल्काजगिरी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. रेवंत रेड्डी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी 10 हजाराच्या मताधिक्याने टीआरएसच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 2018 मध्ये झालेल्या पराभवाचा त्यांनी बदला घेतला होता. 2023च्या निवडणुकीत त्यांनी केसीआर यांचा घामटा काढला होता. रेवंत रेड्डी यांच्या मेहनतीमुळेच काँग्रेस पहिल्यांदाच राज्यात सरकार बनवणार आहे.

अनुमुला रेवंत रेड्डी (ए रेवंत रेड्डी) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1969 रोजी झाला. आमदार ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 2009 ते 2014 दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभा आणि 2014 ते 2018 दरम्यान तेलंगणा विधानसभेत ते होते. तेलंगणात ते टीडीपीचे आमदार होते. टीडीपीतून ते दोनदा विजयी झाले होते. ऑक्टोबर 2017मध्ये त्यांनी टीडीपी सोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसची वाट पकडली. जून 2021मध्ये त्यांना तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

रेवंत रेड्डी हे महबूबनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या एव्ही कॉलेजातून बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली होती. रेवंत यांच्या बायकोचं नाव गीता आहे. गीता या काँग्रेसचे दिग्गज नेते जयपाल रेड्डी यांची भाची आहे. रेवंत आणि गीता यांना एक मुलगीही आहे.

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री नियुक्तीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडवर सोडण्यात आला. या प्रकरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही पसंती रेवंत रेड्डी यांना असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी रेवंत रेड्डी यांचे नाव अंतिम करण्यात आलं.

तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार असलेले रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या विरोधानंतर सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा रद्द करावा लागल्याचीही चर्चा आहे.

रेवंत रेड्डी यांना विरोध केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, माजी सीएलपी नेते भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा समावेश आहे. या नेत्यांनी रेवंत रेड्डी यांच्या उमेदवारीला विरोध केला, भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधले.

रेड्डी यांना 2021 मध्ये तेलंगणा काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली, तेव्हा त्यांच्यासमोरही आव्हान होते. त्यांच्यावर हे पद मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप होता.

Protected Content