…आधी संघर्ष आणि आता मुकद्दर का सिकंदर !

अमळनेर-गजानन पाटील ( Exclusive ) | आजच्या प्रचंड हादरा देणार्‍या राजकीय नाट्यानंतर अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रीपद मिळाले असून मोठ्या संघर्षानंतर ते खर्‍या अर्थाने मुकद्दर का सिकंदर ठरले आहेत.

 

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तिसरा तर अमळनेरला पहिला मंत्री मिळाला आहे. अमळनेरच्या पहिल्या नेत्याने या पदावर झेप घेतली असल्याची बाब देखील लक्षणीय आहे. अनिल पाटील यांची आजवरची वाटचाल ही अतिशय झंझावाती अशीच राहिली असली तरी आमदारकीसाठी त्यांना खूप वेळ वाट पहावी लागली. डॉ. बी.एस. पाटील यांचे तिकिट कापून त्यांना २००९ साली भाजपचे तिकिट मिळाले असले तरी या लढतीत साहेबराव पाटील यांनी बाजी मारली. तर पुढील म्हणजे २०१४ सालच्या निवडणुकीत तिरंगी लढत होऊन शिरीष चौधरी यांनी विजय संपादन केला.

 

२०१९ सालच्या निवडणुकीत अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवून विजय  संपादन केला. यानंतर त्यांच्या यशाचा आलेख वाढतच गेला. महाविकास आघाडीच्या काळात अजितदादांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात भरीव निधी आणला. तर गेल्या वर्षभरात ते दादांसोबतच होते. दरम्यान, त्यांच्यावर पक्षाने प्रतोदपदाची मोठी जबाबदारी देखील टाकली होती. यानंतर आज त्यांना मंत्रीपद मिळाले आहे.

 

या माध्यमातून कधी काळी आमदारकीसाठी प्रचंड संयम साधत दहा वर्षे वाट पाहिलेल्या आमदार अनिल भाईदास पाटील यांना आमदारकीच्या अवघ्या साडेतीन वर्षातच मंत्रीपद मिळाल्याने ते नशिबवान ठरले आहेत. अमळनेरला मोठा राजकीय इतिहास आहे. साथी गुलाबराव पाटील, डॉ. बी.एस. पाटील, स्मिताताई वाघ आदी मोठे नेते येथे झालेत. यात आता अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या पुढचा पल्ला गाठत थेट मंत्रीपद पटकावून आपल्या कामगिरीची पताका फडकावली आहे.

Protected Content