‘मी अनिल भाईदास पाटील’ ! . . .जळगाव जिल्ह्यास तिसरे मंत्रीपद !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आजच्या नाट्यमय घटनेनंतर मंत्रीपदाची शपथ घेतली असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तिसरे मंत्रीपद मिळाले आहे.

 

आज राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. आज सकाळपासून अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली. यानंतर इतर नेते हे शरद पवार यांच्या निवासस्थानी जमा झाल्याने काही तरी मोठे घडणार असल्याचे स्पष्ट झाले.

 

यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास अजित पवार हे आपल्या सहकार्‍यांसह राज्य सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. यात प्रामुख्याने  अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेण्याची माहिती समोर आली. यानंतर अजित पवार हे आपल्या सहकार्‍यांसह राजभवनाकडे निघाले.

 

राजभवनात तातडीने मंत्रीमंडळाच्या शपथविधीची तयारी सुरू झाली. यात पहिल्यांदा अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांनी देखील शपथ घेतली. यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

 

अनिल भाईदास पाटील हे अजितदादा पवार यांचे अतिशय जवळचे सहकारी असून पहाटेच्या शपथविधीच्या प्रसंगात देखील ते त्यांच्या सोबत होते. यानंतरच्या कालखंडातही ते अजितदादांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जात आहेत. यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तिसरा मंत्री मिळाला आहे.

Protected Content