श्रीरामाच्या गजराने दुमदुमली शेगाव नगरी ! : लक्षावधी भाविक दाखल

शेगाव-अमोल सराफ | आज राम नवमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगावात लक्षावधी भाविक दाखल झाले असून सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्मित झाले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी संस्थानाने चोख नियोजन केले आहे.

संत नगरी शेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी १३० वा श्रीराम नवमी उत्सव सोहळा चैत्र शुद्ध ९ आज रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. काल रात्रीपर्यंतच साडेसहाशे दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून अद्यापही याचा ओघ सुरूच आहे. श्रीराम जय राम जय जय राम, जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते मंत्राचा नाम घोष करीत भजनी दिंड्या टाळ मृदंगाच्या निनादात संतनगरीत दाखल होत होत्या.

दरम्यान, श्रींच्या मंदिरात १३० वा श्रीराम नवमी उत्सवाला गुढीपाडवा ९ एप्रिल पासून प्रारंभ झाला. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमानुसार १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सव पार पडत आहे. त्या अनुषंगाने श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज मंदिरामध्ये काकडा भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन आधी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.

श्रीराम नवमी उत्सवादरम्यान आध्यात्म रामायण स्वाहा कारास यागास १३ एप्रिल ला आरंभ होऊन आज बुधवार १७ एप्रिल श्रीराम नवमी दिनी सकाळी यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होणार आहे . त्यानंतर सकाळी १० ते १२ यादरम्यान ह.भ.प श्रीराम बुवा ठाकूर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होईल.त्यानंतर श्रींची पालखी दुपारी ४ वाजता श्रींच्या पालखीचे नगरपरिमेला सुरुवात होईल. श्रींची पालखी रथ, मेणा ,अश्व, टाळकरी, पताकाधारी इत्यादीकातून परिक्रमेला निघणार आहे. सायंकाळी श्रींची पालखी श्रींच्या मंदिरात नगर परिक्रमा करून पोहोचेल व आरती होईल. रात्री ८ ते १० ह.भ.प.श्रीहरी बुवा वैष्णव यांचे किर्तन होणार आहे

श्रींच्या पालखीचा परिक्रमा मार्ग

संत श्री गजानन महाराज मंदीर उत्तर द्वार (जनरेटर रुम जवळील) मधुन बाहेर, महात्मा फुले बँकेसमोरुन, क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले चौक, संत श्री सावता महाराज चौक, श्री हरिहर मंदीर, भीम नगर, तिन पुतळा परिसर, न प शाळा क्र., फुले नगर, श्री प्रगटस्थळ, सितामाता मंदीर, श्री लायब्ररी पुलावरुन श्रीं मदीराचे पश्चिम गेट मधुन श्रींचे मंदीर परिसरामध्ये परत असा पालखीचा मार्ग राहणार आहे.

दर्शनासाठी एकेरी मार्ग

श्रींचे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचे पारायण मंडप, श्रींची गादी पलंग, दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विधुत रोषणाई…

श्रींच्या मंदिर परिसरात आंबेच्या पानांचे तोरण, केळीच्या खांबा, रंगबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.तसेच श्रींचे आराध्यदेवत असलेल्या प्रभु श्री राम व श्रींच्या मंदिरावर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीराम नवमी उत्सवाची सांगता १८ एप्रिल रोजी श्रीराम बुवा ठाकूर यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे किर्तन व दहिहंडी,गोपालकाला होऊन या उत्सवाची सांगता होईल.

Protected Content