आजी-माजी आमदारांविषयीची नाराजी चोपड्यात ठरणार निर्णायक

prabhakar sonavane 1

जळगाव प्रतिनिधी । येथील आजी-माजी आमदारांविषयी सर्वसामान्य जनतेमध्ये असणारी नाराजी या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तर दुसरीकडे समाजकल्याण सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांच्या पाठीशी संपूर्ण भाजप आणि शिवसेनेतील सर्वात मोठा गट असल्याने या निवडणुकीत त्यांनी प्रबळ आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे.

चोपडा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना घरकूल प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाले. यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींना शिवसेनेने उमेदवारी दिली. तर माजी आमदार जगदीश वळवी यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना आव्हान दिले आहे. दरम्यान, समाजकल्याण सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्याने येथील लढत रंगतदार बनली आहे. आजच्या स्थितीत त्यांच्यासोबत भाजप पूर्णपणे असल्याचे स्पष्ट झाले असून शिवसेनेतील सर्वात मोठा गटदेखील त्यांचा प्रचार करत आहे. चोपडा तालुक्याच्या राजकारणातील एक ध्रुव असणारे माजी आमदार कैलासबापू पाटील हे स्वत: त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांना इंदिराताई पाटील यांचीही समर्थ साथ मिळालेली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात माधुरी पाटील आणि चंद्रकांत बारेला यांनीदेखील उडी घेतलेली असली तरी येथे आजी-माजी आमदारांविषयीची नाराजी हा निवडणुकीचा निकाल ठरवण्याची शक्यता आहे.

प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विशिष्ट कंपूलाच पाच वर्षे सोबत घेतल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. तर जगदीश वळवी यांनी गेल्या पाच वर्षात कोणताही संपर्क न ठेवल्याचा फटका त्यांना बसू शकतो. पाच वर्षे फिरूनही न पाहता ऐन वेळी फक्त पैशांच्या बळावर निवडणुकीत विजय मिळवण्याच्या त्यांच्या मनसुब्यांना यावेळी धक्का बसू शकतो. आजी-माजी आमदारांविरूध्दची हीच नाराजी या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. दरम्यान, प्रभाकरआप्पा सोनवणे यांची कोरी पाटी असल्यामुळे त्यांच्या विरूध्द बोलण्यासाठी कोणताही मुद्दा विरोधकांकडे नसल्याने ते हैराण असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. प्रभाकरआप्पांचे प्रबळ आव्हान हा आता चर्चेचा विषय झालेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता जनता आजी-माजी आमदारांना धक्का देण्याच्या स्थितीत असली तरी याबाबत निकालातूनच सारे काही स्पष्ट होणार आहे.

Protected Content