भाजपला स्व. निखील खडसे यांच्या फोटोची अ‍ॅलर्जी कशासाठी ? : नाथ फाऊंडेशनचा सवाल

जळगाव प्रतिनिधी । आज भाजपच्या कार्यालयातून एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेसोबत त्यांचे पुत्र तथा खासदार रक्षाताई खडसे यांचे पती दिवंगत निखील खडसे यांची फ्रेम देखील काढण्यात आल्यामुळे याबाबत नाथ फाऊंडेशनने आक्रमक भूमिका घेत भाजपला स्व. निखील खडसे यांच्या फोटोची अ‍ॅलर्जी कशासाठी ? असा प्रश्‍न विचारला आहे.

नुकतेच भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे पक्षाच्या वसंत स्मृती या जिल्हा कर्यालयातील दर्शन भागात असणारी त्यांची प्रतिमा आज काढण्यात आली. ही बाब स्वाभाविक असली तरी यासोबत त्यांचे पुत्र तथा भाजपचे दिवंगत जिल्हा परिषद सदस्य निखील खडसे यांची फ्रेम देखील काढून टाकण्यात आली. याच्या विरूध्द आता खडसे समर्थक आक्रमक झाले असून सोशल मीडियात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. याबाबत नाथ फाऊंडेशनने भाजपवर टीका केली आहे.

या संदर्भात नाथ फाऊंडेशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपाच्या जळगाव येथील वसंतस्मृती कार्यालयात भाजपाच्या विद्यमान खासदार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांचे पती स्व.निखिलदादा खडसे यांच्या स्मृतीनिमित्त सात वर्षांपुर्वी लावण्यात आलेली फ्रेम काढण्यात आल्याच कळाले. सदरील घटना ही अतिशय क्लेशदायक, दु:खदायक मनाला वेदना देणारी आहे.

विशेष म्हणजे युवकांचे प्रेरणास्थान व भाजपाचे माजी जि.प. सदस्य असलेल्या निखिलभाऊंच्या पत्नी श्रीमती रक्षाताई निखिल खडसे या भाजपा च्या खासदार असतांना देखील आज स्व.निखिलदादांच्या जीवनपटावरील आधारीत कवितेत गुंफलेली फोटो फ्रेम काढण्यात आल्याने आम्ही भारतीय जनता पार्टीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवितो. भाजपाचे संघटनमंत्री जळगाव जिल्ह्यात पक्ष संघटन वाचविण्याकरता आले होते की कार्यालयांमधील फोटो फ्रेम काढण्यासाठी हा मोठा प्रश्‍न असल्याचे यात म्हटले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, एकेकाळी निखिलभाऊंसोबत भारतीय जनता पार्टीच्या विस्ताराचे काम केलेल्या दोघ जिल्हाध्यक्षांना निदान मनाची तरी हवी होती. असे कृत्य करतांना त्यांच्या मनाला पाझर फुटला नाही यावरुनच त्यांच्या कुत्सित विचारांचे प्रदर्शन होते. नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यावर भाजपाची विचारधारा एवढी खालावेल अस वाटल नव्हतं असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिल माळी, माजी नगरसेवक रविंद्र पाटिल, डॉ.अभिषेक ठाकुर यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content