हिरकणी महाराष्ट्राची व डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन योजनांना प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । महिला बचत गटांना आणि जनसामान्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना संधी देणार्‍या हिरकणी महाराष्ट्राची आणि डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन या योजनांना आज केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रारंभ करण्यात आले.

राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या हिरकणी महाराष्ट्राची आणि डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन या योजनांचे अनावरण केन्द्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा नागरी उड्डयण मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते मंत्रालय येथील वॉर रुममधून व्हीसीद्वारे करण्यात आले. हिरकणी महाराष्ट्राची योजनेद्वारा ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. ज्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांना उद्योगाचे व्यासपीठ शासन उपलब्ध करुन देणार आहे. त्याचप्रमाणे डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन या योजनेतून ग्रामीण विकास, आरोग्य, तंत्रज्ञान, कृषि या मुलभूत गोष्टींशी निगडित नाविन्यपूर्ण कल्पनांना उद्योगाच्या स्वरुपात मूर्तरुपात आणण्यासाठी शासन अर्थसहाय्य करणार असून जनसामान्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना पाठबळ देणारा हा स्तूत्य उपक्रम आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व जिल्हयातील इच्छुक लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन ना. सुरेश प्रभु यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून केले.

दरम्यान, याप्रसंगी, कौशल्य विकास उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्य शासनाच्या या नाविन्यपूर्ण योजनांसाठी केंद्र शासनाने अर्थसहाय्य केल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. उद्योग विकासात महिलांचा सहभाग वाढविण्यावर शासन प्रामुख्याने लक्ष देत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महिला बचत गटांना उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन हिरकणी महाराष्ट्राची तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारी डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन योजना राबवित आहे. तरी सर्व जिल्ह्यांनी या योजनांना भरीव स्वरुपात यशस्वी करण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, कौशल्य विकास अधिकारी श्रीमती अनिसा तडवी यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा नियोजन कार्यालयाचे लेखाधिकारी श्री देशमुख व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content