किराणा दुकानदाराची लाखाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी  | एका ऑनलाईन शॉपिंग ॲपचा कस्टमर केअर ऑफिसर बोलत असल्याचा भासवून सायबर चोरट्यांनी किराणा दुकानदाराची १ लाख ३७ हजार ५०० रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील किराणा दुकानदार सैय्यद अरशद अली अख्तर अली (वय ३०) यांनी मीशो ऑनलाईन खरेदी ॲपच्या माध्यमातून काही वस्तू मागविल्या होत्या. दरम्यान ११ मे २०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान सैय्यद अली यांना अनोळखी क्रमाकांवरुन त्यांच्या मोबाईलवर फोन आला. संबंधिताने मीशो या ऑनलाईन खरेदी ॲपच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून सैय्यद अली यांना एनी डेक्स या नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड करताच संबंधिताने सैय्यद अली यांच्या बँकेच्या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने परस्पर १ लाख ३७ हजार ५०० रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर बुधवार, १८ मे रोजी सैय्यद अली यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Protected Content