दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील !- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । दिव्यांग हा समाजातील अतिशय उपेक्षित घटक असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. आज पंचायत समितीत दिव्यांगांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील होते.

सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता प्रत्येक बुधवारी पंचायत समिती जळगाव येथे दिव्यांग मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आले.. त्यात दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून मिळणार्‍या सर्व योजनांची माहिती व मार्गदर्शन दिव्यांगांच्या विशेष शाळेतील विशेष शिक्षक करतील. ० ते ६ वर्षे वयोगटातील दिव्यांग बालकांना शिक्षण ,शिघ्र निदान व उपचार याबाबत योग्य मार्गदर्शन करतील. ६ ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शाळेबद्दल मार्गदर्शन, दिव्यांगांना व्यवसाय प्रशिक्षण व पुनर्वसन याबाबत मार्गदर्शन करतील या व्यतिरिक्त दिव्यांग ओळखपत्र यु. डी.आय डी कार्ड योजना दिव्यांग शिष्यवृत्ती, दिव्यांगांना पाच टक्के निधीतून मिळणार्‍या योजना, दिव्यांग वित्तीय महामंडळ कडून मिळणारे कर्ज योजना, तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र मार्ग कडून मिळणार्‍या योजनांची माहिती व  मार्गदर्शन या कक्षात करण्यात येणार आहे.

या मार्गदर्शन कक्षाचे उदघाटन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाला  जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील ,जिल्हा समाज कल्याण विभागाचे वै. सा. का. भरत चौधरी, पंचायत सभापती नंदलाल पाटील, पंचायत समितीचे सदस्य समाधान चिंचोरे, जना आप्पा कोळी, डॉ कमलाकर पाटील, गटविकास अधिकारी एस.बी सोनवणे, गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की दिव्यांग हा समाजातील अतिशय उपेक्षित असा घटक आहे. त्याला मदतीची गरज असते. या सल्ला व मार्गदर्शन केंद्रामुळे त्याला विविध प्रकारच्या २४ योजनांबाबत ची माहिती ही एकाच ठिकाणी मिळणार आहे. आपण सातत्याने दिव्यांगांच्या उत्थानासाठी काम केलेले आहे. आजवर आपण अनेक दिव्यांगांना मदत केली असल्याचे प्रतिपादन ना.  गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. तसेच ते म्हणाले की आपण १९९२ पासून लोकप्रतिनिधी असून पंचायत समिती सदस्य पासून ते आज पालकमंत्री पर्यंतची वाटचाल करत असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकमेकांशी असणार्‍या सहकार्याशिवाय कामे होत नसतात. याच प्रकारे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी एकत्रीतपणे दिव्यांगांच्या उत्थानाचे काम करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

दिव्यांग सल्ला मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन झाल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना स्वावलंबन यु. डी. आय. डी. कार्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमात जळगाव शहरातील व जळगांव तालुक्यातील दिव्यांगाना युडी कार्ड स्वावलंबन कार्ड वाटप करण्यात आले तसेच दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीना जिल्हा परिषद जळगांवचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण विभागाचे वै.सा.का.चे  भरत चौधरी यांनी केले. 

सूत्रसंचालन  विशेष शिक्षक राहुल पाटील यांनी केले तर आभार ग्रा.पं. विस्तार अधिकारी ढाके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी साठी पंचायत समिती चे अरुण साळुंखे व सर्व कर्मचारी पं. स. व उत्कर्ष मतिमंद विद्यालय चे मुख्याध्यापक संजय बोरसे व  विशेष शिक्षिका सरोज बडगुजर आदींनी केले.

 

Protected Content