सरपंच ते कॅबिनेट मंत्री : गिरीशभाऊ महाजन यांचा चित्तथरारक प्रवास

जळगाव-जितेंद्र कोतवाल ( स्पेशल रिपोर्ट ) | जामनेरचे आमदार गिरीशभाऊ महाजन Girish Mahajan यांनी आज अपेक्षेनुसार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दुसर्‍यांदा मंत्रीपदावर आरूढ झालेल्या गिरीशभाऊंची आजवरची वाटचाल ही अनेक खाचखळग्यांनी भरलेली आहे. जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आलेख !

संघ, अभाविप, भाजयुमो ते भाजप !

गिरीश दत्तात्रय महाजन यांचा जन्म जामनेर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील त्या काळातील कृषी पदवीधर शिक्षक होते. आपल्या मुलाने देखील अकॅडमीक करियर करावे अशी त्यांची साहजीकच इच्छा होती. मात्र या तरूणाला एक मोठे क्षितीज खुणावत होते. कॉलेजमध्ये शिकत असतांनाच संघ आणि अखील भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आकृष्ट झालेल्या गिरीश महाजन यांनी राजकारण व समाजकारणातच कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला. यथावकाश ते भारतीय जनता युवा मोर्चा आणि नंतर भारतीय जनता पक्षात कार्यरत झाले. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी जामनेर शहरात त्यांच्या भोवती सळसळत्या तरूणाईचा भला मोठा ग्रुप उभा राहिला. राम जन्मभूमिच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन त्यांची जोरदार आगेकूच होत असतांना १९९२ साली त्यांच्या सौभाग्यवती साधनाताई महाजन या तेव्हाच्या जामनेर जिल्हा परिषद गटातून जि.प. सदस्या म्हणून निवडून गेल्या. काही महिन्यातच गिरीश महाजन यांच्याकडे जामनेर ग्रामपंचायतीची धुरा आली. हा कार्यकाळ पूर्ण होत नाहीच तोच, १९९५ सालची विधानसभा निवडणूक आली.
मतदारसंघाच्या अदला-बदलीने मिळाली संधी

तेव्हा भाजप-शिवसेना युती असल्याने विधानसभा जागा वाटत हे युतीच्या फॉर्म्युल्यानुसारच होत असे. आधीच्या म्हणजे १९९० सालच्या निवडणुकीत भुसावळहून भाजप तर जामनेरातून शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक लढविली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ मतदारसंघ आग्रह करून मागून घेत तेथून दिलीप भोळे यांना उमेदवारी दिली. तर अर्थातच, याच्या बदल्यात जामनेरातून शिवसेनेऐवजी भाजपला संधी मिळाली अन् साहजीकच तेव्हाचे सरपंच असणार्‍या तरूण व उर्जावान गिरीश महाजन यांना संधी मिळाली. तेव्हापासून ते आजवर लागोपाठ सहा वेळेस याच मतदारसंघातून निवडून येण्याचा पराक्रम गिरीशभाऊ महाजन यांनी केला आहे.

सहा निवडणुकांमध्ये असा मिळविला विजय !

१९९५ साली गिरीश महाजन यांनी तेव्हाचे कॉंग्रेसचे बलाढ्य नेते ईश्‍वरलाल जैन यांना पराभूत केले. महाजन यांना ६३६६१ तर जैन यांना ४३६२४ इतकी मते मिळाली. १९९९च्या निवडणुकीत त्यांच्या समोर राष्ट्रवादीत गेलेल्या ईश्‍वरबाबूजींच आव्हान दिले. मात्र ५६४१६ मते मिळवून गिरीश महाजनांनी पुन्हा बाजी मारली. बाबूजींना ४१४७९ मते मिळाली. २००४ साली संजय गरूड यांनी अपक्ष निवडणुकीत उडी मारून महाजन यांना आव्हान दिले. या निवडणुकीत गिरीशभाऊंना ७१८१३ तर गरूड यांना ४२५०० मते मिळाली. २००९ मध्ये याच संजय गरूड यांनी कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून गिरीश महाजन यांचा तगडे आव्हान दिले. महाजनांच्या कारकिर्दीत हीच निवडणूक त्यांच्यासाठी थोडी कसोटी घेणारी ठरली. मात्र ८९०४० मते मिळवून ते विजयी झाले. तर संजय गरूड यांना ८१५२३ मते मिळाली. २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर डिगंबर केशव पाटील यांनी त्यांना आव्हान दिले. तथापि, गिरीशभाऊंना तब्बल १०३४९८ मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. पाटील यांना ६७७३० मते मिळाली. २०१९ साली पुन्हा एकदा संजय गरूड यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांच्या समोर आव्हान उभे केले. तथापि, गिरीश महाजन यांनी आपली मतसंख्या वाढवत ११४७१४ मते संपादन केली. तर गरूड यांना अवघी ७९७०० इतकी मते मिळाली. अर्थात, १९९९ सालचा अपवाद वगळता गिरीश महाजन यांच्या मतांची संख्या कायम वाढती राहिलेली आहे. तर २००९ निवडणुकीचा अपवाद वगळता त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

वरिष्ठ पातळीवर लौकीक

युती सरकारच्या पहिल्या कालखंडात गिरीशभाऊंची पहिलीच टर्म असल्याने त्यांना कोणते मोठे पद मिळाले नाही. मात्र नंतर एकीकडे आपल्या मतदारसंघावर पोलादी पकड ठेवतांनाच त्यांनी राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. भारतीय जनता पक्षाचा एक अतिशय निष्ठावंत पाईक म्हणून त्यांनी ख्याती अर्जीत केली. याचेच फळ म्हणून २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्यांना जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणासारखी अतिशय तोलामोलाची खाती मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. या पंचवार्षिकच्या उत्तरार्धात राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांचा लौकीक झाला. यासोबत वरिष्ठ पातळीवर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आदींपासून ते विविध उच्चपदस्थ आदींशीही त्यांचे निकटचे संबंध प्रस्थापित झाले. विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला यश मिळवून देण्यात मोठी भूमिका पार पाडली. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे निवडणुकांपासून ते विविध पेचप्रसंगांमधून भाजपला यशस्वीपणे पुढे नेण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे सिध्द झाले. याचमुळे त्यांना भाजपचे संकटमोचक म्हणून उपाधी देखील मिळाली. या प्रवासातील अजून एक योगायोग समजून घेण्याची आवश्यकता आहे. गिरीश महाजन यांच्या आधीच त्यांच्या सौभाग्यवती साधनाताई महाजन यांची राजकीय कारकिर्द सुरू झालेली होती. त्याच साधनाताई आज जामनेरच्या नगराध्यक्षा आहेत.

अडीच वर्षे संघर्षाची !

हे सारे होत असतांना २०१९ नंतरची अडीच वर्षे ही त्यांच्यासाठी खूप संघर्षाची गेलीत. विशेष करून अनेक प्रकरणांमध्ये त्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष करून मविप्र प्रकरणातील वादातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर, आपल्यावर विविध गुन्हे नोंदवून महाविकास आघाडी सरकार मोक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला होता. याच अनुषंगाने तेव्हाचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टींग ऑपरेशन करून याच्या चित्रफिती या विधानसभा सभापतींकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. आता शिंदे सरकार सत्तारूढ झाल्याने या प्रकरणाची फाईल देखील खुली होण्याची शक्यता आहे. मात्र या काळात त्यांना एकूणच खूप मोठा मनस्ताप झाल्याचे सर्वांनी अनुभवले आहे. दरम्यान, अलीकडेच आकस्मीकपणे सत्ता पालट झाल्यानंतर गिरीशभाऊ यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

जमीनिशी जुडलेला नेता

सहा वेळेस वाढत्या मताधिक्याने विजय मिळवणार्‍या गिरीशभाऊंना जमीनीशी जुडलेला नेता म्हणून गणले जाते. समाजाच्या शेवटच्या घटकाशी जुडलेली त्यांची नाळ ही लोकविलक्षण अशीच आहे. तर आरोग्यसेवेचा विचार केला असता, राज्यात त्यांच्या इतके काम खचितच कुणी केले असेल. आमदार गिरीश महाजन यांच्या आरोग्यसेवेची अगदी राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आल्याची बाब लक्षणीय अशीच आहे. खर्‍या अर्थाने लोकनेता या उपाधीला पात्र असणारा हा नेता आज राज्यातील महत्वाच्या खात्याच्या मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीत लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती लाभो ही माफक अपेक्षा.

Protected Content