भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला जखमी झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. या घटनेप्रकरणी सोमवारी ११ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रत्ना छगन वाडेकर (वय-५५ रा. सिंधी कॉलनी, जळगाव) या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीआर ९७००) ने काव्यरत्नावली चौकातून आकाशवाणी चौकाकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एपी ३२५२) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला रत्ना वाडेकर ह्या गंभीर जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेवून पसार झाला होता. जखमी झालेल्या महिलेला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे हे करीत आहे.

Protected Content