धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील नारणे नांदेड रस्त्यावरील कामतवाडी फाट्यावर बसने दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून जाब विचारत जळगाव आगारातील नांदेड बसचे चालकाला बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी घडली. जखमी चालकास जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत धरणगाव पोलीसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोली सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुकाराम आनंद रायसिंग (वय-५०) रा. बांभोरी ता.जळगाव हे जळगाव आगारात नांदेड बसचे चालक म्हणून नोकरी करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तुकाराम रायसिंग हे वाहक अशोक आत्माराम सोनवणे यांच्यासोबत बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३०१९) ने धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे जाण्यासाठी निघाले. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बस नांदेड गावात पोहचली. त्यावेळी नांदेड गावातील राहणारे महेंद्र रविंद्र पाटील हा त्याचा मुलगा, मुलगी आणि पत्नी बसजवळ आले. तर महेंद्र पाटील याने मुलीला कट का मारला असे म्हणून बसमधील चालक तुकाराम रायसिंग यांना बसमधील कॅबिनमध्ये घुसून मारहाण केली. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी वाहक सोनवणे हे आवरण्यासाठी गेले असता महेंद्र पाटील याचा मुगला तेजस महेंद्र पाटील याने ढकलून देत बस जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच रायसिंग यांच्या हातातील ६ ग्रॅमची अंगठी देखील ओढून घेतली आहे. जखमी झालेल्या तुकाराम रायसिंग यांना खासगी वाहनाने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणारे महेंद्र पाटील व त्याचा मुलगा तेजस पाटील या दोघांवर धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सैय्यद अमजद करीत आहे.