Home राजकीय बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का; ‘हा’ पक्ष एनडीएतून बाहेर

बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का; ‘हा’ पक्ष एनडीएतून बाहेर

0
143

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भाजपप्रणित एनडीए सरकारला धक्का देणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी एनडीएसोबतची युती तोडल्याची जाहीर घोषणा केली आहे. पारस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता पासून आमचा एनडीएशी कोणताही संबंध राहणार नाही.”

पाटणा येथे आरएलजेपीच्या कार्यक्रमात पारस यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सरकारवर दलितविरोधी धोरणं राबवण्याचा आरोप करत तीव्र शब्दांत टीका केली. “ही सरकारे दलितांचा अवमान करत आहेत. केंद्र सरकारनेही संसदेच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे,” असा गंभीर आरोप पारस यांनी केला.या कार्यक्रमात पारस यांनी दिवंगत नेते आणि आपले बंधू रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यांच्या कार्याचा उल्लेख करत, पारस म्हणाले की देशासाठी केलेल्या योगदानाच्या आधारावर त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळायला हवा.

एनडीएतून बाहेर पडल्याच्या घोषणेसोबतच पारस यांनी त्यांच्या पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीचाही खुलासा केला. “आम्ही सर्व 243 विधानसभा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत. आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन संघटन मजबूत करतील,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “कोणाशी युती करायची हे मी एकटा ठरवणार नाही, तर पक्षातील सर्व नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. निवडणुकीत ज्या पक्षाने आमचा आणि दलितांचा सन्मान राखला, त्याच्यासोबत युतीचा विचार करू.” पशुपती पारस यांच्या या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. एनडीएला मिळणारा पाठिंबा आता आणखी घटण्याची चिन्हे दिसत आहेत. आरएलजेपीचा हा निर्णय निवडणूकपूर्व राजकीय घडामोडींमध्ये निर्णायक ठरू शकतो.


Protected Content

Play sound