भुसावळ प्रतिनिधी | शहरातील श्रध्दानगरातील रहिवासी सचिन नामदेव भगत याच्या हत्ये प्रकरणी हद्दपार आरोपी मुन्ना चौधरी याला अटक करण्यात आली आहे.
सचिन नामदेव भगत या तरूणाचा मृतदेह शुक्रवारी पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुन्ना चौधरी याला अटक केली आहे. मृत सचिनचा गुरुवारी वाढदिवस होता. यामुळे त्याने रात्री मुन्ना चौधरी आणि अजून एक तरूण या मित्रांसोबत पार्टी केली होती. मद्याच्या धुंदीत त्यांच्यात वाद उफाळून आल्यानंतर मुन्ना चौधरी याने फावड्याने वार करून सचिन भगतचा खून केला. यानंतर एका वाहनातून सचिनचा मृतदेह जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर आणून फेकला.
दरम्यान, या प्रकरणात मुन्ना चौधरीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला जळगावात अटक केली. खून प्रकरणी मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, एपीआय अनिल मोरे घटनास्थळी आले. मृतदेहाची ओळख पटवली. याप्रकरणी सचिनची पत्नी सपना भगत यांच्या फिर्यादीवरून मुन्ना चौधरी, राहुल कल्ले, जितू पावरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुन्ना चौधरी हा सध्या हद्दपार अवस्थेत असला तरी शहरात त्याचा वावर असल्याचे यातून सिध्द झाले आहे. तर खून झालेला सचिन भगतहा देखील २०१६-१७ मध्ये हद्दपार झाला होता. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षात त्याच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नव्हता. मात्र मुन्ना चौधरी सोबतची मैत्री त्याच्या प्राणावर बेतली आहे.