शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे आज निधन झाले असून त्यांच्या माध्यमातून एक निष्ठावंत शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

ऐंशीच्या दशकाच्या मध्यपासून भुसावळ शहरात शिवसेना रूजविण्याचे काम ज्या शिवसैनिकांनी केले, त्यात राजेंद्र दायमा यांचा मोठा वाटा होता. नव्वदच्या दशकात ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर देखील झाले होते. मात्र स्थानिक समीकरणे पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ येथील विराट सभेत त्यांच्या ऐवजी दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली. आणि भोळे नंतर दोनदा आमदार झाले. मात्र असे असूनही खट्टू न होता राजेंद्र दायमा हे शेवटपर्यंत आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पहिल्या युती सरकारच्या काळात त्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

 

गेल्या अनेक दिवसांपासून राजेंद्र दायमा आजारी असल्याने अंथरूणाला खिळून होते. आज सकाळी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पुत्र ऍड. निर्मल दायमा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेवर शोककळा पसरली आहे.

Protected Content