कर्ज भरणा करूनही थकबाकीदार दाखविले ! : वराडसीम विकासोतील प्रकार

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये बर्‍याच शेतकर्‍यांनी कर्ज भरले तरी त्यांना थकबाकीदार दाखविण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याची चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वराडसीम येथील विविध कार्यकारी सोसायटीचा अनेक शेतकर्‍यांनी भरणा केला तरी त्यांना थकबाकीदार दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकर्‍यांना भरणा केल्याच्या पावत्या देण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या सातबारावरील बोजा कमी करण्यात आलेला नाही. याबाबत विकासोच्या पदाधिकार्‍यांकडे संबंधीतांनी विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार संस्थेचे सचिव भास्कर सिताराम पाटील व लिपीक तेजस्वर ढाके यांच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून त्यांच्याकडे विचारण्याचे सांगितले.

यामुळे शेतकर्‍यांनी विकासो सचिव व लिपीकाकडे विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे मिलींद ज्ञानदेव ढाके यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी संबंधीत विकासो सचिव व लिपीकासह कार्यकारी मंडळ व इतरांना कयदेशरी कारवाईबाबत नोटीसा पाठविल्या. याला इतर कुणीही उत्तर दिले नाही. तर लिपीक तेजस्वर ढाके यांनी कर्ज घेणे, भरणा करणे, बोजा बसविणे व उतारणे या प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नसल्याचे अजब उत्तर दिले.

यानंतर २७ फेब्रुवारी रोजी वरिष्ठ लेखा परिक्षक पी. डी. पाटील हे वराडसीम येथे चौकशीसाठी आले असतांना अनेक शेतकर्‍यांनी भरणा केल्याच्या पावत्या व विकासोने दिलेला नील दाखला त्यांना दाखविला. यावर विकासो सचिव भास्कर सीताराम पाटील यांनी या पावत्या बनावट असल्याचे सांगितल्याने वाद झाले. याप्रसंगी उध्दव बाळू कचरे, सुधाकर जंगले या शेतकर्‍यांनी आपल्यासोबतही फसवणूक झाल्याची तक्रार केली. तर, कमलाकर सुरेश कोल्हे यांनी गेल्या वेळेच्या ऑडिबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Protected Content