Home प्रशासन भुसावळ ते दीपनगर रोजगार मोर्चा ; ९ जूनला वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

भुसावळ ते दीपनगर रोजगार मोर्चा ; ९ जूनला वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

0
8


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या २५ किलोमीटर परिसरातील स्थानिक युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे, प्रकल्पग्रस्त व प्रदूषणग्रस्त गावांतील सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा तसेच भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ९ जून २०२६ रोजी भुसावळ ते दीपनगर रोजगार मोर्चा आणि दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगार हक्कासाठी आवाज बुलंद करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा परिसरातील अनेक गावांच्या त्यागातून उभा राहिलेला महत्त्वाचा ऊर्जा प्रकल्प मानला जातो. प्रकल्प उभारणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या असून आजही अनेक गावांना प्रदूषणाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, या त्यागानंतरही परिसरातील हजारो सुशिक्षित युवक बेरोजगारीशी झुंज देत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असून ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे.

मोर्चा मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भुसावळ येथून सुरू होणार आहे. त्यानंतर शक्तीगड मार्गे दीपनगर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या मध्यवर्ती कार्यालय आणि प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेण्यात येणार असून तेथे त्याचा समारोप होईल.

या मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे, सर्व कंत्राटदार कंपन्यांनी स्थानिक भरतीचा तपशील सार्वजनिक करणे, रोजगार प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणणे, युवकांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, प्रकल्पग्रस्त व प्रदूषणग्रस्त गावांतील युवकांसाठी विशेष रोजगार धोरण लागू करणे तसेच दीपनगर प्रकल्पातील विविध विभागांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

मोर्चामध्ये स्थानिक युवक, प्रकल्पग्रस्त नागरिक, शेतकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. हा मोर्चा पूर्णपणे संविधानिक, लोकशाही आणि शांततामय मार्गाने काढण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष विजय ऊर्फ बाळा पवार यांनी परिसरातील सर्व युवक, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “जमीन आमची… त्याग आमचा… मग रोजगारावर हक्कही आमचाच!” या घोषवाक्यासह रोजगाराच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound