Home Cities जळगाव एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेनेची वाढती ताकद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. पक्षवाढीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असून जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये भुषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राझिक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी आणि तौफिक खान यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले. शिवसेनेची विचारधारा, विकासाभिमुख भूमिका आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची पक्षाची भूमिका यामुळे अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पक्षात दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत संघटन बळकटीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी आणि तळागाळातील जनतेपर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचे शिवसेनेकडे वाढते आकर्षण आणि संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने होत असलेल्या हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound