Home प्रशासन धनराज पाटील यांची मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

धनराज पाटील यांची मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

0
14

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी पिचर्डे येथील युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप भिकनराव पाटील यांनी धनराज पाटील यांना निवडपत्र देऊन ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली.

धनराज पाटील गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच ग्रामीण भागातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडत आहेत. समाजातील उपेक्षित व गरजू घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

पत्रकारितेबरोबरच धनराज पाटील हे निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान तसेच निसर्ग संरक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय कार्याचीही दखल घेण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महासंघाच्या सामाजिक, शैक्षणिक, संघटनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रमांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे धनराज पाटील यांनी सांगितले. तसेच महासंघाच्या विविध उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी माध्यमांशी प्रभावी समन्वय साधण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील महासंघाच्या विविध उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, समाजातील प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रसिद्धी विभागाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर धनराज पाटील यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. धनराज पाटील यांच्या निवडीबद्दल भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील मित्रपरिवार, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound