Home Cities भुसावळ फुलगावच्या सरपंचपदी शाम फुलगावकर कायम ; विरोधकांचा हिरमोड

फुलगावच्या सरपंचपदी शाम फुलगावकर कायम ; विरोधकांचा हिरमोड

0
15


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शाम फुलगावकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला ग्रामस्थांनी स्पष्टपणे नाकारत त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष ग्रामसभेत झालेल्या मतदानात सरपंचांच्या बाजूने बहुमताचा कौल मिळाल्याने शाम फुलगावकर हे सरपंचपदी कायम राहणार असून विरोधकांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

फुलगाव ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी सरपंच शाम फुलगावकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ५ जून रोजी फुलगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले.

विशेष ग्रामसभेदरम्यान सरपंचांवरील विश्वासाबाबत ग्रामस्थांचे मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गावाच्या नेतृत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. झालेल्या मतदानात शाम फुलगावकर यांना विरोधकांच्या तुलनेत तब्बल ४८ मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या प्रक्रियेत दीड हजारांहून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

फुलगाव ग्रामपंचायतीत भाजपचे आठ सदस्य असून त्यांच्या वतीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे शाम फुलगावकर हे सध्या शिवसेनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मतदानाकडे केवळ ग्रामपंचायत पातळीवरील नव्हे तर स्थानिक राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात होते. ग्रामस्थांनी सरपंचांच्या बाजूने कौल दिल्यानंतर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या निकालाची चर्चा संपूर्ण भुसावळ तालुक्यात रंगली आहे. ग्रामस्थांच्या निर्णयामुळे फुलगावमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करत मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी आपला आनंद व्यक्त केला.


Protected Content

Play sound