शुभमच्या जिद्दीला डॉ. नि. तु. पाटलांच्या मदतीने मिळणार गती !

भुसावळ प्रतिनिधी । प्रतिथयश नेत्ररोगतज्ज्ञ तथा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी आत्यंतीक काबाडकष्ट करून शिक्षण घेणार्‍या शुभम सोनारची प्रेरणादायक गाथा सोशल मीडियातून व्हायरल करून त्याला अप्रत्यक्ष मदतीचा हात तर दिलाच, पण आज आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभमला सायकल भेट देऊन त्याच्या जिद्दीला गती देखील प्रदान केली आहे.

प्रतिथयश नेत्ररोगतज्ज्ञ तथा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी जळगाव येथील शुभम सोनार या तरूणाच्या जिद्दीची कथा सोशल मीडियातून शेअर केली असता याला अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला. यामुळे शुभमच्या चिकी व्यवसायाला चालना मिळाली. यातच त्यांना शुभम हा जळगावात पायी फिरून चिकी विकत असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभमला सायकल भेट दिली. यामुळे आता त्याला आयुष्याची लढाई लढतांना नवीन बळ मिळणार आहे. या संदर्भात डॉ. नि. तु. पाटील यांनी व्यक्त केलेले मनोगत जसेच्या तसे खाली देत आहोत.

आणि मोठे पाटील पाहतच राहिले…..!

आज 6 डिसेंबर आमचे मोठे पाटील, चि. वेदांत यांचा वाढदिवस …!
बघता बघता मोठे पाटील आता सहा वर्षाचे झाले.
चि. वेदांतला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

तसा तिथीनुसार वाढदिवस हा “दत्तजयंतीचा” आतापर्यंत चि. वेदांतचा प्रत्येक वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत केलेला आहे, जसे शाळेमध्ये शालेय उपयोगी वस्तू वाटणे, मुला-मुलींना शूज सॉक्स वाटणे , गोडधोड जेवण देणे, शाळेच्या बॅग वाटप करणे, ब्लँकेट वाटप करणे, स्वच्छता किट वाटप करणे,…. आदी आदी उपक्रम हे प्रत्येक वाढदिवसाला मोठे आणि छोटे पाटील या दोघांच्या वेळेस पाटील परिवार करत आहेत.यावर्षीदेखील या उपक्रमाची थोडी अजून व्याप्ती वाढावी म्हणून एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे.

दि. 3 ऑक्टोबर 2020 ला मी जळगाव शहरातील चि. शुभम सोनार या विषयी ची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

“कोवळया खांद्याला जबाबदारीच भान…!”

चिरंजीव शुभम हा संपूर्ण जळगाव शहरात चिक्की विकत असून आपल्या परिवाराची तसेच स्वतःची आणि आपल्या प्रथमेश लहान भावाच्या शिक्षणाची योग्य ती काळजी घेत आहे.त्यासाठी त्याला जळगाव चे लोकप्रिय आ.मा.राजुमामा भोळे आणि डॉ.राजेशजी दाभी (मेंदू विकार तज्ञ) यांची मोलाची साथ लाभत आहे. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिरंजीव शुभम साठी मलासुद्धा पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून विचारणा झाली. सदर पोस्ट द्वारे चिरंजीव शुभम चे कार्य भरपूर ठिकाणी पोहोचल्याने त्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा झाला.
तसेच मागील दोन रविवार सतत तो भुसावळ मध्ये सुद्धा येत असून भुसावळ मधील भाजी मार्केट, सराफ गल्ली आदी मध्ये देखील त्याला चांगला प्रतिसाद लाभला.विशेष म्हणजे त्याने मला तसे फोन द्वारे कळवले देखील…!

एक दिवशी माझे मित्र श्री. रत्नाकर पाटील यांनी मला सांगितले की हा मुलगा फार होतकरू असून ते दोन्ही भाऊ घरापासून संपूर्ण जळगाव शहरात पायी पायी फिरतात ,मी त्यांना भरपूर वेळेस माझ्या दुचाकीवर लिफ्ट दिली आहे ,त्यांना विचारले की,रिक्षा का नाही करत?
शुभम म्हणतो,”चिक्की विकून जे पैसे मिळतात,ते रिक्षा भाड्यात कसे घालु? तुमच्यासारखी माणसे आम्हाला लिफ्ट देतात, नाहीतर पायी पायी ….!”

तेव्हाच मी ठरवले होते,चि. वेदांत यांचा वाढदिवसाच्या दिवशी इतर उपक्रम न करता चि. शुभम ला कमी वेळामध्ये जास्त ठिकाणी पोहोचता यावे आणि वाचवलेल्या वेळेत आपला अभ्यास करता यावा या दूरदृष्टीने आज ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे मोठे पाटलांच्या हस्ते चि. शुभमला सायकल आणि श्री रामरक्षा भेट देण्यात आली .

सर,राहू द्या,नको सर, पण कशाला सर,
राहु द्या सर, आपण जुनी सायकल घेयु, ही राहू द्या, नको सर, असे करत शेवटी त्याला म्हटले राहू दे,फक्त अभ्यास कर कारण आता तुझा वेळ वाचेल…!

आज सायकल भेट देत असताना चि. शुभमला एकीकडे आनंद झाला तर लगेच दुसऱ्या क्षणाला आनंदाश्रू आले हे सर्व दृश्य बघुन मला गहिवरून आले…!

चि. वेदांत ला काय होत आहे कळालेच नाही….!
आणि मोठे पाटील पाहतच राहिले…..!

“जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो” -डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

म्हणून चि. शुभम आणि चि. प्रथमेश यांनी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करावा, मोठं व्ह्याव त्यासाठी कधीही त्यांनी हाक द्यावी, असा विश्वास मी शुभम ला दिला आणि भुसावळ परतीच्या वाटेला लागलो.

आज मानवतेचे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन….!

(माझ्या सर्व फेस बुक मित्रांना विनंती आहे,मी शुभम सोनार चा मोबाइल नंबर देत आहे,कृपया हात जोडून विनंती आहे, जळगाव गेल्यास शुभम ला फोन करा आणि नक्की चिकि, सोनपापडी आदी विकत घ्या आणि त्याला मदतीचा हात द्या… @ शुभम सोनार 93223 06065 )

डॉ. नि. तु. पाटील,भुसावळकर

8055595999

Protected Content