ग्रामपंचायतीच्या आरओ प्लांटमध्ये आकोडे टाकून वीज पुरवठा

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायतीची मालकी असणार्‍या आरओ वॉटर प्लांटमध्ये आकोडे टाकून वीज चोरीचा प्रकार समोर आली असून या प्रकरणी महावितरणतर्फे कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, साकेगाव ग्रामपंचायतीने अलीकडेच आरओ वॉटर प्लांट सुरु केला आहे. मात्र, या प्लँटसाठी महावितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केली जात होती. याबाबत महावितरणकडे तक्रार झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने महावितरणचे सहाय्यक अभियंता डी.आर.कोल्हे यांनी आपल्या सहकार्‍यासह पाहणी केली. त्यात तारांवर आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तत्काळ केबल जप्त करण्यात आली. तसेच वीज चोरी होत असलेल्या ठिकाणचा वीज दाब मोजणी करण्यात आली. वीज वापर होत असलेल्या दिवसापासून कारवाई होईपर्यंतच्या दाबानुसारचे बिल ग्रामपंचायतीला सोमवारी देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता डी.आर.कोल्हे यांनी दिली आहे.

तर या संदर्भात साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे यांनी ही तक्रार चुकीची असून यामुळे ग्रामस्थांनी वेठीस धरण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ही तक्रार आकस बुध्दीने करण्यात आली असून आम्ही याच्या चौकशीला सामोरे जाऊ.

Protected Content