भाजपच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन; कारवाई करा : गुप्ता

जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या पक्ष कार्यालयात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात शासकीय नियमांचे उल्लंघन झाले असून या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

सध्या कडक निर्बंध सुरू असून कोरोनाचे रूग्ण कमी झाले असले तरी बेफिकिरी महागात पडू शकते. यामुळे प्रशासन सक्त कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या जळगाव दौर्‍यात फिजीकल डिस्टन्सींगसह नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर, यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी झालेल्या गर्दीबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत गफ्फार मलीक यांच्या तीन मुलांसह ५० जणांच्या जमावाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमांत फिजीकल डिस्टन्सींग व जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याने याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे.

गुप्ता यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली असून यात या कार्यक्रमाचे हेतू हा जनकल्याणाचा असला तरी यात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने कार्यवाही व्हावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावर आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content