भुसावळ नगरपालिकेवर औट घटकेसाठी फडकला राष्ट्रवादीचा झेंडा (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी | नगरपालिकेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत काही दिवस उरलेली असतांनाच येथील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह २१ नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भुसावळ नगरपालिकेवर औट घटकेसाठी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून तांत्रिकदृष्ट्या भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.

नोव्हेंबर २०१६ साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले होते. यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे रमण देविसाद भोळे यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी यांना पराभूत केले होते. तर भाजपचे २७ नगरसेवक देखील निवडून आले होते. अर्थात, भारतीय जनता पक्षाला येथे एकहाती सत्ता मिळाली होती.

एकनाथराव खडसे यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तथापि, पक्षांतरासह अन्य कायदेशीर बाबींमुळे अडचण येऊ नये यासाठी भुसावळचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. यानंतर नगरसेवकांच्या घरातील अन्य सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नगरसेवक मंडळी देखील पुढे राष्ट्रवादीत जातीलच हे स्पष्ट झाले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात भुसावळ नगरपालिकेतील २१ नगरसेवकांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात प्रामुख्याने मुकेश पाटील, बोधराज चौधरी, वसंत पाटील, पूजा सूर्यवंशी आदींसह इतरांचा समावेश आहे. यामुळे येथील नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता संपुष्टात आली आहे. अर्थात आता विद्यमान नगरपालिकेची मुदत ही २६ तारखेला संपत असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हा तितक्याच दिवसांपर्यंत फडकणार आहे. यानंतर नगरपालिकेवर प्रशासक लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीवर अनिश्‍चीततेचे सावट आहे. यातच आता राष्ट्रवादीत जोरदार इनकमींग झाल्यामुळे पक्षाची ताकद वाढली हे देखील तितकेच खरे. याचा शहराच्या आगामी राजकारणावर परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.

खालील व्हिडीओत पहा भुसावळ येथील नगरसेवकांचा प्रवेश सोहळा.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/997527677639796

Protected Content