Home Cities जळगाव महापौर दीपमाला काळे यांची अनोखी झलक; नगरसेवकांसह जलकुंभात उतरून पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी

महापौर दीपमाला काळे यांची अनोखी झलक; नगरसेवकांसह जलकुंभात उतरून पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरात पावसाळ्यापूर्व स्वच्छता अभियानाला वेग देत महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी एक धाडसी आणि अनोखे पाऊल उचलत भाऊंच्या उद्यान परिसरातील महानगरपालिकेच्या जलकुंभात स्वतः उतरून पाहणी केली. शहराला शुद्ध पाणी मिळावे हा नागरिकांचा हक्क असल्याचे अधोरेखित करत त्यांनी प्रत्यक्ष कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

सोमवारी दुपारी सुमारे ४ वाजता महापौर दीपमाला काळे या १०० फूट उंच जलकुंभावर पोहोचल्या. या जलकुंभाची क्षमता २८ लाख लिटर असून पावसाळ्यापूर्वी शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने साफसफाईची मोहीम राबवली जात आहे. या कामाची प्रत्यक्ष स्थिती तपासण्यासाठी महापौरांनी स्वतः निसरड्या लोखंडी शिडीवरून टाकीत प्रवेश केला.

त्यांच्यासोबत प्रभागाचे नगरसेवक नितीन बरडे, रितिक ढेकळे तसेच पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता घृष्णेश्वर साळुंखे यांनीही जलकुंभात उतरून कामाची पाहणी केली. टाकीतील गाळ काढणे, स्वच्छता प्रक्रिया आणि पाणी साठवण व्यवस्थेची स्थिती याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

टाकीच्या आत अत्यंत दमट आणि त्रासदायक वातावरणात सात कर्मचारी सफाईचे काम करत होते. त्यांच्या मेहनतीची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी तात्काळ पिण्याचे पाणी आणि चहाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत “तुम्ही प्रामाणिकपणे काम करत आहात,” असे म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले.

या पाहणीदरम्यान पावसाळ्यापूर्वी शहरातील जलकुंभ पूर्णपणे स्वच्छ करण्यावर भर देण्यात आला असून आतापर्यंत तीन जलकुंभांची साफसफाई पूर्ण करण्यात आली आहे. केवळ तात्पुरती मोहीम न राबवता डिसेंबर महिन्यात पुन्हा सर्व जलकुंभांची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी जाहीर केले.

या मोहिमेदरम्यान प्रभाग क्रमांक १२ येथील नगरसेविका उज्वला बेंडाळे, नितीन बरडे, प्रभाग क्रमांक १३ चे नितीन सपके, प्रफुल्ल देवकर, प्रभाग १४ चे रबियाबी अमजद खान, रितिक ढेकळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  महापौरांच्या या प्रत्यक्ष सहभागामुळे प्रशासनात कामाबाबत अधिक जबाबदारी आणि पारदर्शकतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही त्यांच्या या कृतीचे मोठे कौतुक होत आहे.

 


Protected Content

Play sound