चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नारायण नगर परिसरालगत असलेल्या हातनूरच्या उजव्या कालव्याजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रदीप राजू माळी (वय अंदाजे…) असे मृत युवकाचे नाव असून त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक नागरिकांना कालव्याच्या शेजारी संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेच्या गांभीर्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी अधिक सखोल तपासासाठी फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली. त्यामुळे मृतदेह पुढील तपासासाठी जळगाव येथे हलविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून संशयितांचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.



