जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेरी ते जामनेर रस्त्यावर गणपती नगर बोर्डाजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातानंतर दुचाकीस्वार कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्यादीचे पती युवराज अशोक पाटील हे आपल्या दुचाकीवरून (एमएच १९ बीएक्स २२२८) जात होते. दरम्यान, नेरी बाजूने भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीने (एमएच १९ ईसी ५३४२) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात युवराज पाटील हे गंभीर जखमी झाले.

अपघात घडल्यानंतर आरोपी चालक मुरलीधर कासार हा जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी युवराज पाटील यांना तातडीने जळगाव येथील न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी छाया युवराज पाटील यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल चाटे हे करत आहेत.



