टोलचा ‘तो’ निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलन : आ. सावकारेंचा इशारा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद येथील टोल नाक्यावर मासिक पासधारकांसाठी लावण्यात आलेली जाचक अट रद्द करावी, अथवा आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार संजय सावकारे यांनी दिला आहे.

नशिराबाद येथील टोल नाक्यावर नियमीतपणे ये-जा करणार्‍यांसाठी मासिक पासची व्यवस्था आहे. यात दिनांक १ ते महिना अखेर पर्यंत पास ग्राह्य धरला जातो. आधी महिनाभरात केव्हाही पास काढला तरी तो महिना अखेरपर्यंत चालत असे. मात्र अलीकडेच
नशिराबाद टोल नाका प्रशासनाने, १ ते १० तारखेपर्यंत मासिक पास काढता येईल. नंतरच्या कोणत्याही तारखेला पास मिळणार नाही असा निर्णय घेतला असून याच्या माहितीचा फलक टोल नाक्यावर लावलेला आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून आमदार संजय सावकारे यांनी याची दखल घेतली आहे.

आमदार संजय सावकारे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सिन्हा यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे टोल नाक्याने हा निर्णय आज मागे घ्यावा अन्यथा शुक्रवार दिनांक १७ जून रोजी भाजप आंदोलन करून टोलनाका बंद पाडेल असा इशारा आमदार संजय सावकारे यांनी दिला आहे. त्यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देखील तक्रार देखील केली आहे. यावर आता टोल नाका प्रशासन काय निर्णय घेणार ? याकडे आता लक्ष लागले आहे.

Protected Content