Home क्राईम मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई : शस्त्रसाठ्यासह दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपी जेरबंद; मुख्य...

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई : शस्त्रसाठ्यासह दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपी जेरबंद; मुख्य आरोपीसह दोघांचा शोध सुरू


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन संशयितांना अटक केली आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फरार झालेल्या मुख्य आरोपीसह आणखी दोघांचा शोध सुरू असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर पहाटे एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला. त्या वेळी परिसरात नियमित गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या सेकंड मोबाईल पथकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकासह दोन संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, वाहनात उपस्थित असलेल्या अन्य दोन संशयितांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर स्कॉर्पिओ वाहनाची कसून झडती घेण्यात आली. या झडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन आणि एक बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून, आरोपी दरोड्याच्या तयारीत असल्याचा प्राथमिक अंदाज तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.

तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध राज्यातील विविध जिल्ह्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बीड, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, नाशिक, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर वाहन चोरी, दरोडा आणि दरोड्याच्या तयारीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध यापूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत गायकवाडविरुद्ध बीड शहर पोलीस ठाणे, त्र्यंबकेश्वर, खुलताबाद, सिडको संभाजीनगर, एमआयडीसी अहिल्यानगर, पाथर्डी, उमरगा, यवत आणि तोफखाना या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीच्या हालचालींमागे मोठे गुन्हेगारी नेटवर्क असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके अशी आहेत. दोघांकडे सखोल चौकशी सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.


Protected Content

Play sound