
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या कला आणि सांस्कृतिक विश्वाला निसर्गसौंदर्याची आगळीवेगळी मेजवानी देणारे निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांच्या ‘निसर्गरंग’ या चित्र प्रदर्शनाचा आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. निसर्गातील विविध छटा, ऋतूंचे बदलते रंग आणि ग्रामीण जीवनातील निसर्गाशी जोडलेली सुंदर दृश्ये यांचे प्रभावी चित्रण असलेल्या या प्रदर्शनाला जळगावकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मूळचे जळगावचे रहिवासी आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांनी आपल्या चित्रांमधून निसर्गाच्या विविध पैलूंना रंग आणि रेषांच्या माध्यमातून साकार केले आहे. ‘निसर्गरंग’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या चित्रकलेसोबतच निसर्गाशी असलेल्या भावविश्वाचे दर्शन घडवणाऱ्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. जळगावातील पु. ना. गाडगीळ अँड सन्स कलादालन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला कला, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, उद्योगपती अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. कमलाकर पाटील, जगन्नाथ बाविस्कर, जळगाव विमानतळाचे संचालक हर्षकुमार त्रिपाठी, पीएनजीचे व्यवस्थापक गिरीश डेरे, कला अध्यापक संघटनेचे अध्यक्ष अरुण सपकाळे, अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाचे उपाध्यक्ष शालिग्राम भिरूड तसेच शेतकी संघाचे अध्यक्ष जयराम सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करत भागवत सपकाळे यांच्या चित्रकलेचे कौतुक केले.
प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या चित्रांमध्ये निसर्गाच्या अनेक मनोहारी रूपांचे प्रभावी दर्शन घडते. हिरव्यागार डोंगररांगा, शांत जलाशय, पावसाळ्यातील धुके, सूर्योदय-सूर्यास्ताच्या मोहक छटा आणि ग्रामीण भागातील निसर्गाशी एकरूप झालेले जीवन यांचे वास्तवदर्शी आणि भावस्पर्शी चित्रण रसिकांना आकर्षित करत आहे. प्रत्येक चित्रातून निसर्गाविषयीची कलाकाराची संवेदनशीलता आणि त्यामागची अभ्यासपूर्ण दृष्टी स्पष्टपणे जाणवते.
भागवत सपकाळे यांनी यावेळी बोलताना जळगावशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त केले. “जळगाव ही माझी माती आहे. इथल्या लोकांनी आणि वातावरणाने माझ्या कलाजिवनाला दिशा दिली. त्यामुळे ‘निसर्गरंग’ प्रदर्शनाचे आयोजन जळगावमध्ये करण्याचा आनंद वेगळाच आहे. जळगावकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन निसर्गाच्या रंगछटांचा अनुभव घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
जळगावच्या सांस्कृतिक विश्वासाठी ही एक महत्त्वाची कलापर्वणी ठरत असून रसिकांसाठी हे प्रदर्शन येत्या १ जूनपर्यंत खुले राहणार आहे. निसर्गाच्या सौंदर्याला कॅनव्हासवर जिवंत करणाऱ्या भागवत सपकाळे यांच्या चित्रांनी जळगावकरांना एक वेगळा कलानुभव दिला असून प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद कलाकारासाठीही प्रेरणादायी ठरत आहे.



