‘तो’ एक आमदार नाथाभाऊंना मतदान करणार ? : भाजपची ‘काऊंटर अटॅक’ची रणनिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्वाचे असतांना माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना जळगाव जिल्ह्यातील भाजपचा एक आमदार मतदान करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संदर्भात वृत्तवाहिनीच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर भाजपनेही मविआतील खडसे विरोधक आमदाराशी संधान बांधत याला ‘काऊंटर अटॅक’चे प्रयत्न सुरू केले आहेत.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले असून यात राष्ट्रवादीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना तिकिट दिले आहे. पक्षीय बलाबल पहाता यात भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन अशा नऊ उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. तर दहाव्या जागेसाठी भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर होणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. या जागेचा निकाल हा पूर्णपणे लहान पक्ष व अपक्ष ठरविणार आहेत. अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का देऊन आपला तिसरा उमेदवार निवडून आणला होता. याच पध्दतीत आता पाचवा आमदार निवडून आणण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यासाठी अपक्षांना गळ घालण्यात येत असतांनाच थेट पक्षातील मते फोडण्याची रणनिती आखण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी गुप्त पध्दतीत मतदान होणार असल्याने कुणी कुणाला मत दिले हे उघड होणार नसल्याने पक्षांतर्गत फाटाफूट देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकते. लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट

एकीकडे भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या विजयासाठी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आशीष शेलार यांच्याकडे धुरा दिली असून ते अपक्षांना आपलेसे करतांनाच मविआत फाटाफुटीची शक्यता जोखून पाहत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीनेही भाजपमधून काही आमदार फोडता येतात का ? याची चाचपणी केली आहे. विशेष करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आकड्यांचे समीकरण पाहता एकनाथराव खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जागा ‘सेफ’ मानल्या जात असल्या तरी फाटाफूट झाल्यास यांच्यापैकी एकाला पराभवाचा धक्का बसू शकतो. हीच शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीतर्फे अतिरिक्त मतांची बेगमी सुरू करण्यात आलेली आहे. यात एकनाथराव खडसे यांच्या भारतीय जनता पक्षातील कट्टर समर्थकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ‘टिव्ही नाईन’ या वाहिनीने तर जळगाव जिल्ह्यातील भाजपचे दोन आमदार हे एकनाथराव खडसे यांना मतदान करू शकतात असा दावा करणारे वृत्त दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तथापि, ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीने दोन नव्हे तर एका आमदारावर लक्ष केंद्रीत केल्याचे वृत्त आहे.

जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यासाठी खडसे समर्थक असणार्‍या एका माजी आमदाराच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला आहे. तथापि, गुप्त मतदान असले तरी या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केल्यास आपल्या राजकीय कारकिर्दीत अडथळा येऊ शकतो हे लक्षात घेऊन त्या आमदाराने अतिशय सावध भूमिका घेतल्याचे समजते. लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट

दरम्यान, दुसरीकडे खडसे समर्थकांना गळाला लावण्याचे प्रयत्न होत असतांना आमदार गिरीश महाजन हे महाविकास आघाडीतील नाराज आमदारांची मोट बांधण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. यात असा दगाफटका झालाच तर मविआतील खडसे विरोधक असणार्‍या आमदाराला आपलेसे करत हा याची परतफेड करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे ‘अटॅक’ला ‘काऊंटर अटॅक’ने उत्तर देण्याची रणनिती आखण्यात आलेली आहे. यातच गुप्त मतदान असल्याने फाटाफूट झाली तरी ती समजणार देखील नसल्याने मतदान करणार्‍या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. परिणामी भाजपमधील मते फोडून एकनाथराव खडसे हे वाढीव मतांनी निवडून येणार की, मविआतील मते फोडून भाजप त्यांना वा मविआच्या अन्य उमेदवाराला पाडणार ? हे आजच सांगता येणार नाही. मात्र जिल्ह्यातील भाजपच्या त्या एका आमदाराच्या चर्चेने राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याची बाब सुध्दा नाकारता येत नाही.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: