नियमांचे पालन करून साजरा करा दुर्गोत्सव : वाघचौरे

भुसावळ प्रतिनिधी | नवदुर्गा उत्सवासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे येथील केले. ते येथील शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

गुरूवारपासून सुरू होत असलेल्या दुर्गोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर भुसावळ येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नायब तहसीलदार शशिकांत इंगळे, शहर पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रताप इंगळे, तालुका पोलीस स्थानकाचे निरिक्षक विकास शेंडे, पालिकेचे अधिकारी वैभव पवार आदींसह दुर्गा मंडळांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, कोरोनामुळे यंदाही दुर्गोत्सवावर बंधने आहेत. मंडळांना कमी जागेत केवळ ४ फूट उंच मूर्तीची स्थापना करता येईल. एवढेच नव्हे सार्वजनिक मंडळस्थळी आरतीसाठी केवळ पाच भाविकांना परवानगी असेल. आरतीसाठी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार असला तरी यासाठी स्वतंत्र अर्ज करुन पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. स्थापना किंवा विसर्जनावेळी मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनीक दुर्गोत्सव मंडळांना गर्दी होणार नाही, याचे नियोजन करावे लागेल. भाविकांना ऑनलाइन दर्शनाची सुविधा निर्माण करुन द्यावी लागेल. सार्वजनिक मंडळांना पूर्वीप्रमाणे मोठे मंडप टाकण्याऐवजी लहान आकाराचे मंडप टाकून रस्ता अडवला जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

डीवायएसपी वाघचौरे पुढे म्हणाले की, नवरात्रोत्सवात यंदाही गरबा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करता येणार नाही. तसेच आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांत गर्दी टाळावी लागेल. महत्वाचे म्हणजे कोविड किंवा अन्य कारणांमुळे जी जुनी सार्वजनिक मंडळे यंदा आदिशक्तीची स्थापना करणार नाहीत. अशा मंडळांची परवानगी कायमस्वरुपी रद्द होणार नाही. पुढील वर्षी नेहमीप्रमाणे परवानगी घेवून त्यांना स्थापना करता येईल अशी माहिती देखील वाघचौरे यांनी दिली.

Protected Content