मुख्यमंत्री आज नेमका कोणता ‘डोस’ देणार ?

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी पक्षातील दोन्ही गट झटून कामाला लागले आहेत. मात्र या गटांना एकत्रीत राहण्यासाठी ते नेमका काय ‘डोस’ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जळगाव जिल्हा भाजपमधील गटबाजी आता अगदी उघड धुम्मसच्या स्वरूपात उफाळून आली आहे. जळगावात आमदार राजूमामा भोळे यांच्याविरूध्द पक्षातील दुसर्‍या गटाने दंड थोपटले आहे तर दुसरीकडे भुसावळात १६ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवरूनही दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. यातच एका गटातील मातब्बर नेत्याची कथित वस्त्रहरण करणारी क्लिप व्हायरल करण्यामागे दुसर्‍या गटाचा हात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. म्हणजे आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर त्या नेत्यासोबत पक्षाच्या अब्रूची लक्तरेदेखील वेशीवर टांगली गेल्याची भावना निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. मात्र नेत्यांना वर्चस्वाच्या लढाईत विजय मिळवण्याची झालेली घाई स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा फटका लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर येत असल्याची बाब महत्वाची मानली जात आहे.

एकीकडे युती झाल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला असला तरी दोन्ही पक्षांना अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. यातील सर्वात भयंकर अध्याय हा भाजपमध्ये सुरू आहे. जर या दोन्ही गटांच्या कारवाया याच प्रकारे सुरू राहिल्या तर भाजपला आगामी निवडणुकीत खूप मोठा फटका बसू शकतो. खरं तर काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तीप्रमुखांच्या मेळाव्यात ना. गिरीश महाजन आणि माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणातून एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांमध्येच या दोन्ही मान्यवरांचे गट प्रचंड गतीने सक्रीय झाल्यामुळे पक्षात असवस्थतेचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे या अंतर्गत कलहाचा वणवा पसरण्याआधीच याला विझवण्याची जबाबदारी श्रेष्ठींवर आहेत. या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही गटांना नेमका काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांचा हा ‘डोस’ कटू असला तरी चालेल, मात्र यामुळे पक्षातील अंतर्गत लाथाळ्या बंद व्हायला हव्यात अशी भावना निष्ठावंत कार्यकर्ते खासगीत व्यक्त करत आहेत.

Add Comment

Protected Content