भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यासह तब्बल पाच जणांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपीला आज नाशिक येथे अटक करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, ६ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला होता. यात स्वत: रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात, मुलगा प्रेमसागर, मुलगा रोहित आणि सुमीत गजरे हे ठार झाले होते. तर ऋत्वीक या मुलासह पत्नी आणि दोन जण गंभीर जखमी झालेले होते. यातील रवींद्र खरात हे भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक असून ऐन निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करून तातडीने धरपकड करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी राज उर्फ मोहसीन अजगरखान, मयुरेश सुरवाडे, शेखर हिरालाल मोघे, आकाश सुखदेव सोनवणे या चार आरोपींना अटक केली होती. तर एक आरोपी गोलू खान उर्फ अरबाजखान अजगरखान हा अद्यापही फरार होता. गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून त्याचा शोध सुरू असतांनाही तो पोलिसांना मिळून आला नव्हता.
या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे पथक करत होते. या पथकाला गोलू खान उर्फ अरबाजखान अजगरखान हा नाशिकमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानुसार आज नाशिक येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे.