इथे ओशाळली माणुसकी ! : पोटच्या पोराला विक्री करण्याचा मातेचा प्रयत्न

Amalner अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणताही उपाय नसल्याने एक महिला ही आपल्या अपत्याला विक्री करण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना येथे उघडकीस आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील गांधीलपुरा भागात एक महिला आपल्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना २८ जुलै रोजी सकाळी मिळाली होती. त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी महिला पोलीस नजमा पिंजारी, दीपक माळी आणि रवींद्र पाटील यांना पाठविले. या पथकाला संबंधीत महिला आढळून आल्याने तिला पोलीस स्थानकात नेण्यात आले.

पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधीत महिलेचे नाव मीराबाई देवा गायकवाड (वय ४० वर्षे ) असून तिच्यासोबत चार मुले आणि तीन मुली होत्या. कोरोनाच्या काळात आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे आपल्यासह मुलांना खाण्यासाठी काहीही नसल्याने आपण मुलांना विकत असल्याची धक्कादायक माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र असे करणे बेकायदेशीर असून भविष्यात ती तिच्या मुलांना विकण्याची शक्यता गृहीत धरून या सातही बालकांना तपासणी करून बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बालकांना विकणे आणि विकत घेणे हा कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा असून कुणी असे करू नये. असे करतांना आढळून आल्यास याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: