भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे गुरुजनांचा सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी, जळगावतर्फे दि.१३ ते १५ जुलै २०२२ कालावधीत समाजसेवी साहित्यिक गुरुजनांचा प्रत्यक्ष घरी जाऊन सत्कार करीत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

प्रारंभी अध्यापक विद्यालयाचे निवृत्त प्रा.वसंत सरोदे यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन सपत्नीक गुरुमाऊली निवृत्त माध्यमिक शिक्षिका शैलजा सरोदे उभयतांचा हृद्य सत्कार भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी उभयतांचे नतमस्तक होत गुरुवंदन करून शुभाशिर्वाद घेतले. आणि गुरुजनांच्या निरोगी,निरामय दिर्घायुष्यासाठी निर्मिकाला प्रार्थना केली. त्याप्रसंगी पेट्रो केमिकल इंजिनिअर रुपेश सरोदे उपस्थित होते.

प्राथमिक विभागाचे निवृत्त शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर आणि कवयित्री उषा हिंगोणेकर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन यांचा पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांनी भावपूर्ण सत्कार केला. भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रारंभी जन्मदात्री अर्थात सिंधु सुतार यांचे पाद्यपुजानासह औक्षण व स्व.पिताश्री ग्रेडेड मुख्याध्यापक सुपडू सुतार यांचे प्रतिमा पुजन आणि पुष्पांजली अर्पण करून विजय लुल्हे यांनी शुभाशिर्वाद घेतले.

गुरुपौर्णिमेला गुरूंनी दिली अनोखी शिष्यदक्षिणा –

गुरुवर्य सुप्रसिद्ध साहित्यिक तथा समिक्षक शशिकांत हिंगोणेकर यांनी पुस्तक भिशीसाठी सुमारे १२०० रुपयांची शैक्षणिक, वाड़मयीन, चरित्रात्मक तसेच बालकाव्यसंग्रह अशा १९ दर्जेदार पुस्तकांची ग्रंथभेट विजय लुल्हे यांना सुपूर्द केली. याप्रसंगी पुस्तक भिशीचे तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनिल दाभाडे उपस्थित होते.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन निवृत्त शिक्षण संचालक शशिकांत हिंगोणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ह.भ.प.मनोहर खोंडे, पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे, राजकुमार गवळी, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एन.दाभाडे, शिक्षक एस.एस.बडगुजर, ग.स.सोसायटी संचालक मनोज माळी, अशोक माळी, भिवसन माळी मान्यवर उपस्थित होते. निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांचाही सत्कार श्री. लुल्हे यांनी केला

आजकाल शिक्षकांना सामाजिक प्रतिष्ठा नाही अशी समाजात ओरड होत  असते तेव्हा शिक्षकही समाजाचे घटक आहेत हे उत्तरदायित्व नैतिकदृष्ट्या स्विकारणे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. किंबहुना शिक्षकांचे सुपूत्र असल्याने ती जबाबदारी जन्मजात आपली आहे. या विशुद्ध अन् निरपेक्ष भावनेने विजय लुल्हे यांनी राबवलेल्या या अनौपचारीक, भावपूर्ण अनियोजीत प्रेरणादायी सत्कार उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रत्येक शिक्षकाने असे गुरुपुजन स्वआचरणाने करून भारतीय संस्कृतीतील उज्जल परंपरा पुढच्या पिढीत वर्धिष्णू केल्या पाहिजेत. असे भावनिक आवाहन निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी केले. उपक्रमासाठी साहित्यिक चंद्रकांत भंडारी व डॉ.सुभाष महाले, म.सा.प. जळगाव शाखाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, डॉ.मिलिंद बागुल यांनी प्रोत्साहन दिले.

Protected Content