जामनेर, भानुदास चव्हाण | रब्बी हंगामात वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा संकटात आला आहे. राज्य शासनाने महिनाभराच्या आत विजेच्या समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आमदार गिरीश महाजन यांनी विराट मोर्चा प्रसंगी दिला आहे.
भारतीय जनता पार्टीतर्फे वीज वितरण कंपनीच्या विरोधात आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. येणाऱ्या काळात जर शासनाने दखल घेतली नाही तर जिल्हास्तरावर भव्य मोर्चा काढू व तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, नगराध्यक्ष साधना महाजन, जि. प. सदस्य अमित देशमुख, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, माजी जि. प .अध्यक्ष दिलीप खोडपे, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, भाजपा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, रमेश नाईक, विलास पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, शेतकरी व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.