भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव ते वाडे मार्गावरील बंद करण्यात आलेल्या एसटी बस फेर्या अखेर पुन्हा सुरू करण्यात आल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकार अशोक परदेशी यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर प्रशासन आणि एसटी महामंडळाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. पाचोरा आगाराकडून बंद असलेल्या बस फेर्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्यामुळे गेल्या जवळपास महिनाभरापासून त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भडगाव ते वाडे मुक्कामीसह तीन बस फेर्या पाचोरा आगाराने अचानक बंद केल्यामुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांचे मोठे हाल होत होते. विशेषतः वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी आणि रोजंदारी करणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल २५ ते २६ दिवस बससेवा बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात पत्रकार तथा वाडे येथील रहिवासी अशोक परदेशी यांनी दि. २ आणि दि. ७ रोजी एसटी महामंडळ तसेच प्रशासनाला निवेदन देऊन बंद बस फेर्या तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्याने अखेर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.

शनिवारी दि. ९ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून भडगाव तहसील कार्यालयासमोर पत्रकार अशोक परदेशी आणि प्रवाशांनी आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाला विविध संघटना, ग्रामस्थ, प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दर्शविला. उपोषणाची तीव्रता वाढत असताना प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या. पाचोरा आगारामार्फत त्याच दिवशी सायंकाळी ४.४५ वाजताची भडगाव ते वाडे बसफेरी सुरू करण्यात आली. तसेच भडगावहून सकाळी ६ वाजता वाडे येथे जाणारी नवीन वाढीव बसफेरी दि. १० पासून तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुढील आठवड्यापासून सर्व बस फेर्या नियमित सुरू राहतील, असे लेखी आश्वासन पाचोरा आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रयास पाटील यांनी सायंकाळी सुमारे ८ वाजता दिले. लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी एसटी महामंडळाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून बससेवा नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
उपोषणस्थळी पाचोरा भडगाव बाजार समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक रमेश पाटील, वंचित बहुजन आघाडीचे गोकुळ संसारे, प्रहार दिव्यांग संघटनेचे कर्तारसिंग परदेशी, राजू हरी परदेशी, संजय कोळी, भरत धोबी, गजानन तांबटकर, निंबा पाटील, सुरेंद्र मोरे, शिवदास महाजन, दीपक पाटील, नेहरू पाटील, महेंद्र मोरे, गोकुळ पाटील, रमेश शिरसाठ, कुणाल शिरसाठ, धनराज शिरसाठ, भूषण पाटील, विजय दोधा पाटील, लक्ष्मण बोरसे, राजू परदेशी, मदन परदेशी, जयसिंग परदेशी, कैलास परदेशी, ओम पाटील, हेमंत पाटील, गफार खान, दीपक जाधव, प्रतिक राजपूत आदींनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला.
अखेर प्रवाशांच्या एकजुटीला आणि पत्रकार अशोक परदेशी यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने भडगाव-वाडे मार्गावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियमित बससेवा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.



